
बेळगाव : ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणावर भाजप आणि काँग्रेसला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दोन्ही पक्ष मगरीचे अश्रू ढाळत आहेत असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केला.
बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आयपीएस अधिकारी आणि आप पक्षाचे नेते भास्कर राव म्हणाले की, कंत्राटदार संतोष पाटील यांनी एका विश्वासाने काम केले. मात्र त्यांचा अपमान करून बिले देण्यास प्रतीक्षा करायला भाग पाडणे त्यांच्या आत्महत्येचे कारण ठरले आहे. याबाबत बोलण्याची नैतिकता कोणत्याही दोन पक्षांमध्ये नाही. काम सुरू झाल्यानंतर तरी पैसे द्यायला हवे होते. पण दोन्ही पक्ष आता मगरीचे अश्रू ढाळत आहेत. या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार फक्त आप पक्षाला आहे, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यातील ‘आप’च्या उमेदवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आप’ बेळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. प्रभावी नेत्यांना हटवता येत नाही हा भ्रम आम्ही दूर करणार आहोत. प्रचार किंवा व्यक्ती महत्त्वाच्या नाहीत. आम्ही पक्षांच्या भ्रष्टाचाराविषयी, कुप्रशासनाबद्दल बोलणार आहे. भ्रष्टाचाराचा थेट फटका लोकांना बसतो. संतोष पाटील यांनी तक्रार केल्यावर लगेचच सरकारने जागे होणे गरजेचे होते, असे ते म्हणाले.
ईश्वरप्पा यांच्या अटकेबद्दल बोलताना भास्कर राव म्हणाले, हे प्रकरण सीआयडीकडे देतो असे कोणीही म्हणत नाहीय. पण कोणी सामान्य माणूस आत्महत्येला कारणीभूत ठरला असता तर त्याला लगेचच अटक केली असती. एफआयआरमध्ये नावे नमूद असलेल्या आरोपींना अटक करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात सरकारच तपास अधिकारी होते. पण तपास अधिकाऱ्यांना सर्व स्वातंत्र्य दिले पाहिजे. या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. मात्र, तपासात सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta