
बेळगाव : महात्मा बसवेश्वर, शंकराचार्य आणि बेळवडी मल्लम्मा या महान व्यक्तींच्या जयंत्या भव्य प्रमाणात साजऱ्या करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सदर महान व्यक्तींच्या जयंत्यांचे आचरण कशापद्धतीने करण्यात यावे, यावर विचारविनिमय करण्यासाठी पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. वीरशैव आणि बसव जयंती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ होते. दि. ३० एप्रिल रोजी बसवेश्वर गार्डन येथे सकाळी ८.३० वाजता जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून बसवेश्वर सर्कल येथे मूर्ती परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्योती भावीकट्टी म्हणाल्या, यंदा बसवेश्वर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दरवर्षी ३ दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र यंदा ५ दिवस कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवेश्वर गार्डन येथे दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सत्संग, १ मे रोजी वचन गायन स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता बाईक रॅली, दुसरे दिवशी शांताबाई वृध्दाश्रमाला भेट देण्याचा उपक्रम, सायंकाळी महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दि. ३ मे रोजी बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्योती भाविकट्टी यांनी दिली.
यावेळी भागीरथी जयंती, शंकराचार्य जयंती, तसेच बेळवडी मल्लम्मा जयंती देखील भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीला डीसीपी रवींद्र गडादि, एसीपी सदाशिव कट्टीमनी, एडीसी अशोक दुडगुंटी, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या विद्यावती भजंत्री, बसवराज रोट्टी, मल्लेश चौगुले, महादेव तळवार, ज्योती भाविकट्टी, रत्नप्रभा बेल्लद, रमेश कळसण्णावर, सुजित मुळगुंद, राजू मगदूम आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta