
बेळगाव : बेळगावातील गुडशेड रोडजवळील जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचे भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगावातील गुडशेड रोडजवळ जनकल्याण ट्रस्टतर्फे बांधण्यात येत असलेल्या जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना रा. स्व. संघाचे नेते मंगेश भेंडे म्हणाले, जगन्नाथराव जोशी यांना पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अद्वितीय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या नावाने स्मारक सभागृह बांधण्यात येत आहे. जगन्नाथराव हे आधुनिक काळातील ऋषी होते. त्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांचे स्मारक बांधण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तातडीने होकार दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, जगन्नाथराव जोशी यांच्या स्मारकाची पायाभरणी माझ्या हस्ते होतेय हे माझे भाग्य आहे. मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांचा चाहता म्हणून आलो आहे. त्या अजातशत्रूचे वागणे सर्वांनाच सुखावणारे होते. नरगुंद येथे जन्म घेऊन त्यांनी पुण्याला कर्मभूमी बनवली. रा. स्व. संघाचे सर्व सिद्धांत आत्मसात करून संघाचे ते नेते बनले. आपल्या कार्याने जगन्नाथराव जोशी उत्तर कर्नाटकातील घराघरात पोहोचले. मध्य प्रदेशमधील भोपाळमधून ते खासदार बनले. धारवाड लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. देशाबद्दल त्यांचे विचार स्पष्ट होते. गोवा मुक्ती चळवळीत जगन्नाथराव यांची भूमिका प्रमुख होती. त्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. कर्नाटकात जनसंघ स्थापण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी पाया रचला म्हणून भाजप देशभर पसरत आहे. त्यांचे स्मारक उभारणीसाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार मंगल अंगडी, आरएसएस अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, उत्तर कर्नाटक सह प्रांत कार्यवाह अरविंदराव देशपांडे, क्रीडा भारतीचे निमंत्रक अशोक शिंत्रे, मंत्री उमेश कत्ती, गोविंद कारजोळ, सी. सी. पाटील, आ. अभय पाटील, महादेवप्पा यादवाड, अनिल बेनके, पी. राजीव, महेश कुमठळी, अरुण शहापुर, हनुमंत निरानी, दुर्योधन ऐहोळे, महांतेश दोडगौडर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, महांतेश कवटगीमठ, जगदीश मेटगुड्ड आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta