
बेळगाव : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. आपल्या देशाला नवे शैक्षणिक धोरण वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केले. बेळगावमधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियम हॉलमध्ये भारतीय शिक्षण मंडळाचा कर्नाटक उत्तर विभाग तसेच व्हीटीयू यांच्या सहयोगाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमंलबजावणीसंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायण हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना ते म्हणाले, कर्नाटकात प्रथमच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व विद्यापीठांमध्ये एनपीनुसार पहिली परीक्षा झाली आहे. समाज, संस्कृती, नैतिकता, सामाजिक बांधिलकी यांचे सर्वोत्कृष्ट हित जपून, सर्वांसाठी उत्तम आयुष्याची निर्मिती करणे, आणि उत्तम भविष्य निर्माण करणे, तसेच प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार बहाल करणे हे आमचे ध्येय असल्याचे अश्वथनारायण म्हणाले. यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी उपस्थितांना संबोधित केले. ब्रिटिश प्रशासनाने राबविलेल्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येत असून नव्या शैक्षणिक धोरणानुसार समाजातील शिक्षण व्यवस्था आणि व्यक्ती यात महत्वपूर्ण बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. सच्चीदानंद जोशी हे होते. यावेळी आरएसएसचे समन्वयक डॉ. मनमोहन वैद्य, भारतीय शिक्षण मंडळाचे कर्नाटक उत्तर विभागाचे अध्यक्ष डॉ. सतिष जिगजिन्नी, व्हीटीयू कुलगुरू प्रो. कारिसिद्दप्पा आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta