
बेळगाव : गेली 65 वर्षे बेळगाव सीमा भागातील मराठी जनता न्याय हक्कासाठी लढा देत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. अशा काळात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन, गोव्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी बोलताना केले आहे.
शनिवारी सायंकाळी प्रभाकर ढगे बेळगावला आले असता त्यांचा साहेब फाउंडेशनच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन हिरालाल चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ढगे म्हणाले, बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली सीमाप्रश्नाचा लढा निकाराने देत आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याला तरुण कार्यकर्त्यांच्या युवा समितीचे पाठबळ मिळाले आहे. सीमाप्रश्नाच्या जनजागृतीसाठी युवा समितीचे कार्यकर्ते सीमा भागासह महाराष्ट्रातही प्रयत्न करत आहेत. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमाभागातील जनता विविध प्रकारे निकराचे प्रयत्न करत आहे. त्याच बरोबर बेळगाव सीमाभागात मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागात आयोजित केली जाणारी साहित्य संमेलने आणि विविध प्रकारचे कार्यक्रम सीमालढ्याला बळ देणारे आहे, असेही ढगे यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta