
बेळगाव : कामगारांशिवाय जगाची कल्पना करणे अशक्य आहे. कामगारांच्या घामाची खरी किंमत असू शकत नाही. आज 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. बेळगावात आज कामगार दिनानिमित्त सिटूतर्फे कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ फेरी काढण्यात आली.
दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस मे दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. कामगार वर्गाच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो. बांगलादेश, क्युबा, चीन, जर्मनी अशा अनेक देशांमध्ये 1 मे हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. कामगार दिनाला भारतातही सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. दरवर्षी कामगार दिन साजरा होत असतानाही कामगारांचे प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. त्यामुळे कामगार दिन असूनही बेळगावमध्ये कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी फेरी काढली. धर्मवीर संभाजी सर्कल येथून निघालेली ही फेरी किर्लोस्कर रोडवरून फिरून रामदेव गल्ली येथे विसर्जित झाली.
रामदेव गल्लीतील गिरीश कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत बोलताना कामगार नेते जी. व्ही. कुलकर्णी, नागेश सातेरी म्हणाले, तृणधान्ये, तेल, पेट्रोल, डिझेल, औषधे, भाजीपाला यासह अनेक वस्तूंचे भाव आज गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दराबद्दल बोलू नये अशी स्थिती आहे. कामगार दिवसाला 100 रुपयेही मजुरी मिळत नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत 3 कोटींहून अधिक नोकर्या गेल्या आहेत. सरकार जनतेच्या समस्या न सोडविता भांडवलदार आणि बड्या उद्योगपतींचे हित यावर लक्ष केंद्रित करत आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील 5 भांडवलदारांकडे जवळपास 50 टक्के संपत्ती आहे. उदारीकरण आणि खाजगीकरण दिवसेंदिवस लोकांमधील विषमता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या निषेध रॅलीत मंदा नेवगी यांच्यासह सिटूचे अनेक नेते, कार्यकर्ते व कामगार सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta