चेअरमन दिगंबर पवार यांची माहिती
बेळगाव : बेळगाव परिसरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बुधवार दिनांक 11 मे रोजी मराठा बँकेचा अमृत महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेद्वारे होणाऱ्या, कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, बहुजन समाजाला व्यापार, उद्योग, शिक्षण व त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी मराठा बँकेची स्थापना 1942 साली झाली. 2017 साली बँकेने 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 30 मार्च 2022 अखेर बँकेचे 9307 सभासद आहेत. बँकेचे भाग भांडवल दोन कोटी 70 लाख आहे. बँकेकडे 62 कोटी 50 लाखांचा राखीव निधी आहे. 161 कोटी 11 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने विविध माध्यमातून 82 कोटी 65 लाखांची गुंतवणूक केली आहे. 116 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज वितरित केली आहेत. बँकेचे खेळते भांडवल 235 कोटी 99 लाख रुपये इतके आहे वर्ष सालाअखेर बँकेने 2 कोटी 21 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँक सभासदांना 15 टक्के लाभांश देत आहे.सोने तारण कर्ज देण्यात बँक जिल्ह्यात प्रथम आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. बँकेला आजवर ‘अ’ वर्ग मिळाला आहे.
स्पर्धात्मक युगात तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने बँकेने आपला व्यवहार ए टी एम, एस एम एस, इंटरनेट बँकिंग, नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियामार्फत पेमेंट सिस्टीम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोअर बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना कोणत्याही शाखेतून व व्यवहार करता येत आहे. बँकेच्या सहा शाखा कार्यरत आहेत. नजीकच्या काळात चार नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत. बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून गौरवण्यात आले आहे. तसेच बेळगाव जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनच्यावतीने बेस्ट स्वनिधी असलेली बँक म्हणून गौरविण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून बँकेने दरवर्षी सभासदांच्या गुणवत्ताप्राप्त मुला-मुलींना आर्थिक सहाय्य याबरोबरच सन्मानित केले आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येत आहे. वयाची साठ वर्ष व सभासद होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांना एक हजार रुपये निधी देण्यात येत आहे. वयाची 75 वर्षे व सभासद होऊन 25 वर्ष झालेल्या 125 ज्येष्ठ सभासदांचा गौरव करण्यात आला आहे. बेळगाव परिसरात आयोजित केल्या जाणाऱ्या साहित्य संमेलन व अन्य कार्यक्रमांना बँकेच्या मार्फत आर्थिक मदत दिली जाते. मराठा मंदिर उभारणीमध्ये बँकेचा सिंहाचा वाटा आहे.
कोरोना काळात बँकेमार्फत कोव्हिड सेंटर उभारण्यात आले होते. नजीकच्या काळात सभासदांना आरोग्य सेवा योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. या वर्षी सभासद होऊन वीस वर्ष वयाची 55 वर्षे झालेल्या सभासदांना 2500 रुपये वृद्धापकालीन सुविधा म्हणून देण्यात येत आहे.
आर्थिक मंदीचे सावट आणि कोरोना काळातही बँकेने आपला व्यवहार प्रगतीच्या पथावर नेला आहे. सहकार चळवळीला नवीन दिशा व बळ देण्याबरोबर बहुजन समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी बँकेचा सतत प्रयत्न राहिला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजता बसवाण गल्ली येथील बँकेच्या मुख्य शाखेत अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमृत महोत्सव कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला कॉम्रेड कृष्णा मेणसे अध्यक्षस्थानी राहणार आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी बँकेच्या व्हा. चेअरपर्सन नीना काकतकर, संचालक दीपक दळवी, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मणराव होनगेकर, रेणू किल्लेकर, सुनील अष्टेकर, विश्वनाथ हंडे, बाबुराव पाटील, सुशील कुमार खोकाटे, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक तसेच जनरल मॅनेजर संतोष धामणेकर उपस्थित होते.