
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’ अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी हौताम्य पत्करले आहे. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचा समावेश राष्ट्रपुरूषांच्या यादीत करावा, अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात मी मांडणार आहे, असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
संभाजी महाराज पुतळ्यासमोर रात्री बारा वाजता फटक्यांची तुफान आतषबाजी करण्यात आली. सकाळपासूनच पुतळ्यासमोर विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.
धर्मवीर संभाजीराजे मूर्तीस सकाळी 6 वाजता दुग्धाभिषेक घालण्यात आला. बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक झाला व विधीवत पूजन करून धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी राजू शेट्टी, निशांत कुडे, आदित्य पाटील, श्रीनाथ पवार, प्रसाद मोरे, ओमकार पुजारी, कामराज शाहपूरकर, साईराज चौगुले, स्वयम् फडतरे, रोहित फडतरे, बाळकृष्ण घाटकर, विनायक शेट्टी, इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते
Belgaum Varta Belgaum Varta