बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या असामान्य सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राजश्री राजेश तुडयेकर यांना नवी दिल्ली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘प्राऊड इंडियन पार्लिमेंट अवॉर्ड -2022’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
रफी मार्ग, नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन अल क्लब ऑफ इंडिया येथे गेल्या रविवारी उपरोक्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे मंत्री रामदास आठवले, चित्रपट अभिनेते शहाबाज खान, स्क्वॉड्रन लीडर तुलिका राणी, सामाजिक न्याय खाजगी सचिव डॉ. मनीष गवई, बॉलीवूड गायिका शिबानी कश्यप, आयएचआरएओचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट डॉ. अविनाश साकुंडे आणि डॉ. सागर दोलतडे उपस्थित होते.
यावेळी शहाबाज खान व गवई यांच्या हस्ते बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राजश्री राजेश तुडयेकर यांना “प्राऊड इंडियन पार्लिमेंट अवॉर्ड -2022” या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची समाज कार्यातील डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. राजश्री तुडयेकर या मूळच्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या असून लग्नानंतर त्या बेळगाववासीय झाल्या आहेत. बेळगावातील त्यांचे सासरचे मूळ घर कोनवाळ गल्लीत असून सध्या त्या रिसालदार गल्लीत राहतात. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे लग्नापूर्वी म्हणजे सुमारे 17 वर्षापासून डॉ. राजश्री सामाजिक क्षेत्रात क्रियाशील झाल्या. इस्लामपूर येथे त्यांनी अंध व मूकबधिर मुलांसाठी कार्य केले आहे.
राजश्री तुडयेकर यांनी पुण्यातील 40 आदिवासी पारधी कुटुंबांना दत्तक घेतले असून या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. बेळगावमध्ये देखील विविध सामाजिक कार्यात डॉ. राजश्री नेहमी आघाडीवर असतात. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या काळात राबविण्यात आलेल्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्या अग्रेसर होत्या आणि आजही आहेत. समाजात निराधारांना आधार म्हणून वावरणाऱ्या डॉ. राजश्री तुडयेकर सामाजिक कार्याबरोबरच मार्केटिंग क्षेत्रात देखील अग्रेसर आहेत.
सामाजिक कार्याबद्दल गेल्या मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते गौरविल्या गेलेल्या डाॅ. राजश्री राजेश तुडयेकर यांना आता उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह समाजकार्यातील डॉक्टरेट पदवी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.