Sunday , September 8 2024
Breaking News

आमदार अनिल बेनके यांची भाजप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांची भाजप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी उत्तर आमदारांना भाजप अध्यक्ष बनवण्याचा आदेश बजावला आहे.
वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हणमंत निराणी आणि अरुण शहापूर यांचा उमेदवारी अर्ज आज भरला जाणार आहे त्यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासारखे ज्येष्ठ नेते बेळगावात दाखल झाले आहेत. भाजप राज्य अध्यक्ष कटील देखील बेळगावात आहेत त्यांनी बेनके यांना भाजप अध्यक्ष बनवण्यासाठी बेळगावात बैठक घेत हा आदेश बजावला आहे.
मावळते भाजप अध्यक्ष शशिकांत पाटील यांचा अवधी संपायच्या अगोदर त्यांना पायउतार करण्यात आले असून भाजप हायकमांड याचे नेमके कारण अधिकृतरित्या स्पष्ट केलं नसलं तरी गोव्यातील अश्लील चाळे प्रकरण त्याने भोवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आमदार अनिल बेनके हे उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सदैव व्यस्त असतात. त्यात त्यांना पक्ष संघटना वाढवण्यासाठीची आणखी एक जबाबदारी का देण्यात आली याबाबत ही वेगवेगवळी चर्चा रंगत आहे. अनिल बेनके यांच्या माध्यमातून भाजप अध्यक्षपद मराठा समाजाकडे देण्यात आले आहे. नुकताच बेळगावात मराठा समाजाने गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात एक प्रकारे समाजाचे शक्ती प्रदर्शन झाले होते. मराठा समाजाला पदे मिळावीत याविषयी चर्चा झाली होती त्यामुळेच बेनके यांना महानगर अध्यक्ष देण्यात आले असावे, असेही जाणकारांचे मत आहे.
एकूणच आमदार पद असतेवेळी महानगर अध्यक्ष पद बेनके यांना दिल्याने राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. आता बेनके यांच्याकडे उत्तरचे आमदार पद आणि भाजप अध्यक्ष ही दोन पदे असल्याने आगामी वर्षभरात त्यांचे काम वाढले आहे. बेनके यांना आणखी एक जबाबदारी मिळाल्याने त्यांचे स्थान आता पक्षात आणखी अधिक मजबूत झाले आहे अशीही चर्चा आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *