बेळगाव : नामफलक आणि वरातीत कन्नड गाणी लावण्याच्या वादातून २ गटांत झालेल्या संघर्षात ५ जण जखमी झाले. ही घटना बेळगाव तालुक्यातील धामणे गावात घडली आहे. यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी या वादाला भाषिक संघर्षाचे स्वरूप देऊन मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, धामणे गावात सैबन्नावर नामक एका कुटुंबात गुरुवारी लग्नसोहळा पार पडला. सायंकाळी वधू-वरांची वरात काढण्यात आली. या वरातीवेळी मुद्दाम कन्नड गाणी लावून आक्षेपार्ह डान्स करत एका गटाला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या गटाने केला आहे. याला आक्षेप घेतल्यावर दुसऱ्या गटाने गाणी बंद करण्यास नकार दिला. यावरूनच दोन गटात हातघाई झाली. त्यावेळी आपल्यावर काठ्यांनी हल्ला करून जखमी करण्यात आल्याचा आरोप विजय सैबन्नावर यांनी केला आहे.
या घटनेत वधू-वरांसह ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. अजय येळ्ळूरकर, आकाश येळ्ळूरकर, महेश चौगुले यांच्यासह हल्ला केलेल्या १० जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला झालेल्या सैबन्नावर कुटुंबियांसह निदर्शने करून पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या धामणे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, धामणे गावात एकाच ठिकाणी वसाहतीचे २ नामफलक लावण्यात आले आहेत. कन्नड भाषिकांनी कित्तूर राणी चन्नम्मा नगर असा फलक लावला आहे. तर मराठी भाषिकांनी धर्मवीर संभाजी महाराज नगर असा फलक लावला आहे. या फलकावर कन्नडचा आणि भगवा ध्वजही शेजारीच लावण्यात आले आहेत. धामणे गावात मराठी भाषिकांची संख्या ७०% आहे. ग्राम पंचायतीची अनुमती न घेताच दोन्ही गटांकडून हे फलक लावल्याचा आरोप आहे. कुरबर गल्लीत हे फलक लावण्यात आले आहेत. काल लग्न असलेल्या सिद्दूच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मराठी फलक लावला आहे, वरातीत कन्नड गाणी लावण्याला आक्षेप घेऊन वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून जखमी केल्याचा आरोप कन्नड गटाने केला आहे. त्यामुळे गावात २ भाषिकांच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात केएसआरपीची तुकडी तैनात करण्यात आली आहे. डीसीपी रवींद्र गडादी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात गावातील दोन्ही गटांच्या प्रमुखांची बैठक घेऊन धामणे गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
