Wednesday , July 24 2024
Breaking News

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

Spread the love


बेळगाव : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ९ हुतात्म्यांना बेळगावात आज भावपूर्ण आदरांजली वाहून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या सीमाभागातील मराठी भाषक महाराष्ट्रात जाण्यासाठी तितकेच उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले. कर्नाटकात कन्नड भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ १९८६ मध्ये बेळगावात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुलमी कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मोहन पाटील, परशराम लाळगे, भरमाण्णा कदम, भावकू चव्हाण, कल्लाप्पा उचगावकर, मारुती गावडा, शंकर खन्नूकर, विद्या शिंदोळकर व अन्य एकाचा बळी गेला होता.
या हुतात्म्यांना आज, बुधवारी सकाळी ९ वाजता बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार व पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे अमर रहे, हुतात्मा अमर रहे’, ‘बेळगाव कारवार, खानापूर, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या लढ्यात प्रत्येकवेळी शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. भविष्यातही शिवसेना सीमावासियांच्या सोबत राहून लढा देईल. महाराष्ट्र एकीकरण समितीत विसंवाद निर्माण होऊ न देता सर्वानी एकसंघ, एकत्र राहून आपली शक्ती दाखवून द्यावी, नियोजित हुतात्मा स्मारकासाठी शिवसेना सर्व सहकार्य देईल असे दुधवाडकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील नव्या पिढीला, १८ वर्षांवरील युवावर्गाला सीमाप्रश्नाचा लढा समजावून सांगण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेनेही सीमाप्रश्नासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे. त्याची माहिती आम्ही नव्या पिढीला करून देत आहोत. शिवसेनेकडे महाराष्ट्रात सत्ता आहे, त्या बळावर लवकरात लवकर सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा असे आवाहन केले. तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही बेळगावात आला नाही तरी चालेल, पण महाराष्ट्रात, मुंबईत आंदोलन उभे करा, आम्ही तेथे येऊन सहभागी होऊ, तेथे आंदोलन करून केंद्र सरकारवर दबाव आणून प्रश्नांची सोडवणूक करा असे आवाहन शिवसेनेला केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते मनोज पावशे, खांडेकर, शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर आदींनी विचार मांडले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, महादेव पाटील, दत्ता उघाडे, एस. एल. चौगुले, शिवानी पाटील, दत्ता जाधव, आर. एम. चौगुले, शिवसेना नेते बंडू केरवाडकर, श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर, निपाणी म. ए. समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर यांच्यासह बेळगाव, खानापूर, निपाणीसह सीमाभागातील म. ए. समिती आणि शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

Spread the love  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *