नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. दोघांना ८ जूनला हजर राहण्यास सांगितले असल्याचे समजते.
ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. ईडीच्या या नोटिशीवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. १९४२ मध्ये नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र सुरू केले, त्यावेळी ब्रिटिशांनी त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आज मोदी सरकारही तेच करत आहे आणि त्यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.
ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईवर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी, हम लढेंगे, हम जितेंगे अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोनिया आणि राहुल गांधी ईडीच्या कारवाईला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे तर सूडबुद्धीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. निवडणुका आल्या की यंत्रणांकडून कारवाई होते. भाजप प्रवेश केलेल्यांची चौकशी का थांबते? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, ईडी आणि इतर या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे याचा कोणी दुरुपयोग करत नाहीय, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
