बेळगाव : जनतेच्या भावना भडकविण्यासाठी तसेच समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून पाठ्यपुस्तकांबद्दल विनाकारण गोंधळ माजविण्याचा प्रयत्न होत असून काँग्रेस दहशतवाद पसरविण्याचे काम करत असल्याची टीका कुडचीचे आमदार पी. राजीव यांनी केली आहे.
बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसकडून निष्पाप जनता, साहित्यिकांना लक्ष्य करून त्यांना भडकविण्यात येत आहे. हिट अँड रन अशी वृत्ती आणि संस्कृती काँग्रेसची आहे. बिट कॉईन, साहित्यासंदर्भातील विषय घेऊन. असे विषय दहशतवादाचा टूलकिट म्हणून वापर करत असल्याचा आरोप पी. राजीव यांनी केला.
बरगुरू रामचंद्रप्पाण्णावर यांच्या सिद्धांतांचा आपण आदर करतो. परंतु त्यांनी केलेला मूर्खपणा योग्य नाही. रोहित चक्रतीर्थ यांना विरोध करण्यात येत आहे. मात्र बरगुरू रामचंद्रप्पाण्णावर यांनी सिद्धरामय्या सरकार काळात काय केले आहे हे काँग्रेस नेत्यांनी आठवावे. बसवेश्वर महाराजांचे साहित्य पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले नाही. केवळ टिपू सुलतान, हैदर अली यासह काही विषय काही प्रमाणात वगळण्यात आले आहेत. राणी कित्तूर चन्नम्मा, वीर मदकरी यांची नावे का घेण्यात आली नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
पी. राजीव पुढे बोलताना म्हणाले, सिंधू संस्कृतीसंदर्भातील अभ्यासक्रम वगळून बरगुरू रामचंद्रप्पा यांनी पंडित नेहरूंचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी सोनिया गांधी, सिद्धरामय्या यांची मने वळविली. आता अशीच बाब रोहित चक्रतीर्थ यांनी केली. आठव्या इयत्तेत धर्म या पाठात ख्रिश्चन, इस्लाम, जैन, बुद्ध धर्माविषयी माहिती देण्यात आली आहे. मात्र हिंदू धर्माबद्दल माहिती देण्यात आली नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर साहित्य पुरस्कार परत करण्यात आला. अशा साहित्यिकांनी सत्यता पडताळून पाहावी असा टोला त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेस ग्रामीण जिल्हा भाजप अध्यक्ष संजय पाटील, शहर विभागाचे प्रधान सचिव दडगौड बिरादार, मुरुघेन्द्रगौडा पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
Check Also
इंद्रप्रस्थ नगर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : इंद्रप्रस्थ नगर येथील एका अपार्टमेंट परिसरात सकाळी ५:३० वाजता भटक्या …