बेळगाव : कर्नाटक राज्यात वर्षभरात विविध शहरात विविध स्तरावरील तब्बल साडेपाच हजार क्रिकेट सामने खेळले जातात. यापैकी 500 सामने धारवाड झोन आयोजित करत आहे. धारवाड झोनमधील बेळगाव आणि धारवाड येथील वातावरण क्रिकेटसाठी पोषक असल्याची माहिती, भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे सदस्य सुनील जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आज बुधवारी आटोनगर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षाखालील नवोदित क्रिकेटपटूंच्या कोचिंग आणि ट्रेनिंग कॅम्पला सुनील जोशी यांनी भेट दिली. त्याचबरोबर नवोदित क्रिकेटपटूंना मार्गदर्शनही केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुनील जोशी यांनी, हुबळी आणि बेळगाव येथील स्टेडियमवर क्रिकेट खेळाडूंना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळत आहेत. त्यामुळे या दोन शहरातील स्टेडियमवर रणजी बरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने खेळविले जात आहेत. बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षाखालील नवोदित क्रिकेटपटूंच्या कोचिंग यामध्ये देशभरातून खेळाडू आले आहेत. या शिबिराच्या माध्यमातून त्यांना तज्ञांचे चांगले मार्गदर्शन मिळाले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कर्नाटक राज्यात क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार सुविधांची योग्य ती दखल घेत, कर्नाटक राज्यात सामने भरवण्यासाठी प्राधान्य दिल्याचे ही जोशी यांनी स्पष्ट केले.
यावेळी भारताचा माजी फलंदाज आणि 19 वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंचा मुख्य प्रशिक्षक शिवसुंदर दास, माजी रणजीपटू मंसूर खान, धारवाड विभाग क्रिकेट झोनचे चेअरमन विरांण्णा सौदी, तसेच समन्वयक अविनाश पोतदार यावेळी उपस्थित होते.