बेळगाव : पाठ्यपुस्तक सुधारणा समितीने नववीच्या पुस्तकात बसवण्णांबद्दल चुकीची माहिती दिली आहे. ती हटविण्याच्या मागणीसाठी जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसवसेनेच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.
कर्नाटकात सध्या पाठ्यपुस्तक सुधारणा समितीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तशातच नववीच्या पुस्तकात कर्नाटकचे आराध्य दैवत मानले जाणारे विश्वगुरू बसवण्णा यांच्याविषयी प्रत्यक्षात नसलेलीच आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे. त्यावरून राज्यातील लिंगायत समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी बेळगावातही जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसवसेनेच्या वतीने याबाबत निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.
यावेळी लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी म्हणाले, नववीच्या पाठयपुस्तकात बसवण्णा यांच्याविषयी चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. बसवण्णा उपनयन झाल्यावर कुडलसंगमला गेले अशी माहिती दिली आहे. परंतु ते चुकीचे असून, प्रत्यक्षात बसवण्णा यांनी उपनयन विधीचा तिरस्कार करून कुडलसंगमला गेले होते. त्यांनी लिंगदीक्षा घेतली नव्हती. परंतु पुस्तकात त्यांनी शैव गुरूंकडून लिंगदीक्षा घेतली होती असे चुकीचे नमूद केले आहे. आणखी एक गंभीर चूक म्हणजे बसवण्णा यांनी वीरशैव पंथाचा विकास केला असे नमूद केले आहे. पण बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक होते हे सर्वाना माहित आहे. तरीही वीरशैव पंथाचा त्यांनी विकास केला आहे लिहिणे हे धादांत खोटे आहे असा आरोप रोट्टी यांनी यावेळी केला.
यावेळी, पाठ्यपुस्तकात ही सगळी चुकीची माहिती देण्यात आली आहे. ती अभ्यास करू त्वरित हटवण्याची मागणी निदर्शकांनी केली. एक आठवड्याच्या आत ही चुकीची माहिती न हटविल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निदर्शकांनी दिला. या निदर्शनामध्ये शंकर गुडस, अरविंदा पारशेट्टी, ए. वाय. बेंडीगेरी, एस. जी. सिदनाळ, बी. एस. सुलतानपुरी, सतीश चौगला आदींनी भाग घेतला.