बेळगाव : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा -2022 वारकरी महासंघ बेळगाव यांचा वार्षिक अहवाल आणि पत्रक प्रकाशन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील महाद्वार रोड क्रॉस नं. 3 विठ्ठल -रुक्माई मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह बेळगाव व कोल्हापूर येथील वारकरी संप्रदायातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. यावेळी पायी दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या महाप्रसादासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने 10 हजार रुपयाची भाजी आणि 5 हजार रुपयाचे पिण्याचे पाणी दिले जाईल, असे आश्वासन सागर पाटील, महादेव पाटील, उदय पाटील, विशाल कंग्राळकर, विराज मुरकुबी, सचिन निर्माळकर, पवन मायगोटी व सकल मराठा समाजाच्या अन्य सदस्यांनी दिले.
सदर कार्यक्रमात ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या हस्ते बेळगाव वारकरी महासंघाच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेसह अभिनंदन व आभार पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. सदर पत्रकात ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक -नागपूर येथे किर्तन शास्त्र विभागाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल, तसेच ह.भ.प. श्री शंकरराव बाळकृष्ण बाबली महाराज यांची महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. पत्रकात पायी दिंडी संदर्भातील आभार प्रदर्शन नमूद आहे.
