Sunday , July 26 2026
Breaking News

सुवर्णसौधमध्ये शेवया वाळविणारी मल्लम्मा पुन्हा कामावर

Spread the love

घरही मिळणार बांधून!
बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधसमोर शेवया वाळवल्यावरून कामावरून काढलेल्या मल्लम्मा या महिलेचे नशीब पालटले आहे. तिला पुन्हा कामावर घेण्यासह घरही बांधून मिळणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली.
सुवर्णसौधसमोर शेवया वाळत घातल्याने कामावरून काढून टाकलेल्या मल्लम्माला नेटिझन्समुळे चांगले दिवस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुवर्णसौधसमोर शेवया वाळत घातल्याने सुवर्णसौधचे अवमूल्यन केल्याच्या कारणावरून कोंडुसकोप्प येथे राहणाऱ्या मल्लम्माला कामावरून काढून टाकण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सुवर्णसौधची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराला केली होती. त्यानुसार त्याने मल्लम्माला काढून टाकले होते. मात्र याची माहिती मिळताच नेटिझन्सनी त्याला कडाडून विरोध सुरु केला. ‘आय स्टॅन्ड विथ मल्लम्मा’ अशी मोहीमच नेटकऱ्यानी सोशल मीडियावर सुरु केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता नरमाईची भूमिका घेत मल्लम्माला पुन्हा कामावर घेण्याची सूचना केली आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले की, शेवया वाळत घातल्याचा प्रकरणानंतर कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर कंत्राटदाराने मल्लम्माला दुसऱ्या कामावर पाठवले होते. मात्र तिला पुन्हा सुवर्णसौधमध्येच काम द्यावे यासाठी प्रसारमाध्यमांतून आणि जनतेतून मला निवेदने देण्यात आली आहेत. त्यामुळे मल्लम्माला पुन्हा सुवर्णसौधमध्येच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तशी सूचना कंत्राटदाराला करण्यात आली आहे. सुवर्णसौधच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची दखल घेण्यास सांगण्यात आले आहे. कदाचित आज किंवा उद्यापासून मल्लम्मा कामावर हजर होईल. कोणत्याही कारणास्तव तिचा पगार रोखण्यात येणार नाही. मल्लम्मा कोंडुसकोप्प गावातील आपल्या नातेवाईकांकडे राहते. तिला घर बांधून देण्याची मागणीही होत आहे. त्यामुळे बस्तवाड गावातील जागेवर तिला घर बांधून देण्यात येईल. याबाबत जिल्हा पंचायत सीईओंशी चर्चा करण्यात आली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *