Friday , April 18 2025
Breaking News

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित : नलिनकुमार कटील यांचा दावा

Spread the love

बेळगाव : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दाखविली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ कर्नाटक राज्यातील जनतेला होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यातील भाजप सरकारही शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा, कर्नाटक प्रदेश भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
यावेळी पुढे बोलताना कटील म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण राज्यभरात संपर्क दौरा करत आहोत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण आहे. राज्यातील भाजप सरकारने यापूर्वी शिक्षण क्षेत्रासाठी भरीव कार्य केले आहे. पुढील काळातही शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला विजयाची खात्री आहे.
नेतृत्वहीन असलेल्या काँग्रेस पक्षाने अलीकडच्या काळात आयोजित केलेले चिंतन शिबिर त्या पक्षासाठी चिंतेचे शिबिर बनले आहे. चिंतन शिबिरानंतर काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. अनेक जण काँग्रेस पक्षाशी फारकत घेत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या संदर्भात काँग्रेस पक्षात एकमत दिसून येत नाही. काँग्रेस पक्षात गोंधळाची परिस्थिती आहे. अशावेळी काँग्रेस नेते समाजात संभ्रम आणि अराजकता निर्माण करत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप प्रवक्त्यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जगभरातील मुस्लीम देशात संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना कटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष देशातील प्रत्येक धर्माचा आदर करतो. यासंदर्भात पक्षाची ध्येय धोरणे स्पष्ट आहेत. आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घडामोडींवर विदेश मंत्री समर्पक उत्तरे देत आहेत, असे सांगितले.
अरुण शहापूर यांनी कोरोना काळात मरण पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. या प्रश्नाला उत्तर देताना कटील म्हणाले, गेल्या काही दिवसात झालेल्या त्रुटी आणि चुका सुधारून घेतल्या जातील. असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी आमदार व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, खासदार मंगला अंगडी, खासदार इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, एमएलसी प्रतापसिंह नाईक आणि केशव प्रसाद, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जातनिहाय जनगणती अहवाल : निर्णय न होताच मंत्रिमंडळ बैठकीची सांगता

Spread the love  लेखी अभिप्राय देण्याची सूचना; अहवालावर मंत्र्यांमध्ये मतभेद बंगळूर : जात जनगणना अहवाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *