बंगळूर : राज्यात कोविड-19 संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार त्याच्या नियंत्रणासाठी कांही कठोर उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. मात्र मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले.
राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा अहवाल पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री बोम्मई यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना केली आहे. अहवालाचा अभ्यास करून कोविड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, राज्यात कोरोनाच्या प्रकरणाची संख्या वाढत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्ही नियामक उपाययोजना करत आहोत. विनाकारण घाबरण्याची गरज नाही. आरोग्य सचिव जिल्ह्यातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेतील आणि अहवाल सादर करतील. एक-दोन दिवसांत आम्ही काय करायचे ते ठरवू.
रविवारी, कर्नाटकात 301 नवीन कोविड -19 संसर्ग आणि एकाचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या 222 प्रकरणांपेक्षा हे प्रमाण वाढले आहे.
कर्नाटकच्या शेजारी महाराष्ट्रामध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सीमेवरील जिल्ह्यांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे ते म्हणाले.
बंगळूरात मास्कची सक्ती
सिलिकॉन सिटी बंगळुरमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, कोविड चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, बंगळुर महानगर पलिकेने सार्वजनिक ठिकाणी ’मास्क अनिवार्य’ केले आहे.
राजधानी बंगळुरमध्ये रविवारी 291 पॉझिटिव्ह प्रकरणे आणि एकाचा मृत्यू झाला. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विशेष आयुक्त हरीश कुमार म्हणाले की, वाढत्या प्रकरणांमुळे मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.
शॉपिंग मॉल्स, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, शाळा-कॉलेज आणि लोक जमतात अशा ठिकाणी मास्क अनिवार्य आहे. परंतु सध्याचे धोरण हे सरकारच्या आदेशाचे पालन करते आणि कोणताही दंड आकारत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
