किरण गावडे यांचे आरोप निराधार व बिनबुडाचे : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन
बेळगाव : आज दिनांक 28 ऑगस्ट 2019 च्या दैनिक तरुण भारतच्या अंकात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने हस्तक्षेप थांबवावा अशा आशयाचे एक पत्रक श्री. किरण गावडे यांच्या नावे प्रसिद्धीस दिले आहे. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खुलासा करण्यात येतो की, सध्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा काहीही संबंध नाही. बेळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवणे आवश्यक आहे. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी जनतेस आवाहन करीत आली आहे.
बेळगाव महानगरपालिका क्षेत्रातील भाग शहर महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे दोन्ही समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामास लागले आहेत. उमेदवार निवडीपासून त्यांना विजयी करण्याचे काम त्या-त्या वॉर्डातील पंच मंडळ व नागरिक यांच्यावतीने करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तेथील नागरिकांनी एका उमेदवाराची निवड करून गेले अनेक दिवस रंगुबाई भोसले कार्यालयात कार्य करणार्या समिती पदाधिकार्यांकडे नावे दिली आहेत. अजूनही काही ठिकाणी एकमत होत नसल्याने एकीसाठी प्रयत्न सुरू आहेत असे असता मध्यवर्ती समितीने हस्तक्षेप थांबवावा असे निराधार आणि बिनबुडाचे पत्रके छापून किरण गावडे यांनी लोकांची दिशाभूल करू नये. मुळात या पत्रकात त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणती समिती एकी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि किरण गावडे कुठल्या समितीचे सरचिटणीस आहेत याचा खुलासा करावा.
या पत्रकांत किरण गावडे म्हणतात की, मध्यवर्तीच्या मागे जनता नाही. गावडे यांना हे माहीत असावयास पाहिजे होते की कै. किशोर पवार, प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील, पत्रकार श्री. कुमार कदम यांना संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने मध्यवर्ती पुनर्रचनेचे अधिकार दिले होते. त्याप्रमाणे कै. वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली गेली. या समितीत बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर, निपाणी, बिदर, कारवार भागातील घटक आहेत. समितीच्या स्थापनेपासून अनेकवेळा पंतप्रधान, गृृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व नेतेमंडळी यांच्या भेटीगाठी घेऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबतचे काम मध्यवर्तीच करत आहे. याबाबत किरण गावडे यांना माहीत नसावी याबाबत त्यांची कीव येते. मुंबई सीमाकक्ष आणि दिल्लीतील वकीलांकडून सारी माहिती त्यांनी घ्यावी म्हणजे कोण बरखास्त झाल्यासारखे आहे याची त्यांना कल्पना येईल. मागच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण बेळगाव शहर, बेळगाव तालुका व खानापूर येथील उमेदवारांची निवड त्या-त्या स्थानिक समितीने केली. उमेदवार आशीर्वाद घेण्यासाठी एन. डी. पाटील साहेबांकडे कोल्हापूरला गेले असता कोल्हापूरहून उमेदवार लादले म्हणणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. याउलट किरण गावडे कंपनीने उभे केलेल्या उमेदवाराला केवळ 1800 मते मिळाली हे ऐतिहासिक सत्य आहे.
हे पत्रक देण्यामागे किरण गावडे यांना मराठी मतदारांत गोंधळ निर्माण करावयाचा असून आपल्या मर्जीतील कांही जणांची यादी जाहीर करण्याचा त्यांचा मानस दिसतो. मराठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून मराठी उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
