बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) पदवी पहिल्या वर्षातील दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना विषय बदलण्याची परवानगी दिली जात आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले असून ही यादी विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच विषय बदलता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज दिल्यानंतर ते आपल्या पसंतीच्या विषयाच्या वर्गात बसण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षीचे पदवीचे पहिल्या वर्षीचे वर्ग सुरू आहेत. एनईपीनुसार प्रत्येक सेमिस्टरला विषय बदलता येतो. मात्र विद्यापीठाने विषय बदलण्याची संधी दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. अखेर विद्यापीठाने विषय बदलासाठी परवानगी दिल्यामुळे विद्यार्थी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना करून विद्यार्थ्यांकडून विषय बदलीसाठी रीतसर अर्ज मागविले आहेत. त्यानुसार अनेक विद्यार्थी हिंदी किंवा मराठी विषयाला प्राधान्य देताना दिसत आहेत. कन्नड विषयाला बहुसंख्य विद्यार्थ्यांनी नापसंती दर्शविली आहे. संबंधित यादी महाविद्यालय विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांचे विषय बदलून मिळणार आहेत. विद्यापीठाच्या यूयुसीएमएस ऍपच्या माध्यमातून हे विषय बदलता येणार आहेत.
