प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या सौंदत्ती येथी रेणुका-यल्लम्मा देवीचे लाखो भक्त वर्षभर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. मनातील इच्छा, नवस बोलून दाखवतात. मंदिरातील हुंडीत यथाशक्ती देणगी, दान टाकतात. या हुंडीची दर दीड महिन्यातून एकदा मोजदाद केली जाते. त्यावेळी रोख रक्कम, दागिने, चेकबरोबरच देवी पत्र वाचून मनोकामना पूर्ण करेल या भाबड्या आशेने काही भक्त पत्र लिहून देवीला साकडे घालतात. अशीच काही पत्रे नुकत्याच झालेल्या हुंडीच्या मोजदादीवेळी आढळून आली आहेत. त्यात एका भक्ताने देवीला देणगीचे आमिष दाखविले आहे. ‘माझ्यावर करणीबाधा करणाऱ्यांना बघून घे, मी तुला 50,001 रु. देणगी देतो; असे आमिष दाखवले आहे. माझ्या हितशत्रूंनी करणीबाधा करून माझा व्यवहार मोडलाय. त्यामुळे कर्जदारांची पीडा माझ्यामागे लागलीय. ऑनलाईन गेममध्ये बुडालेले पैसे परत मिळवून दे आई, अशा अनेक प्रकारच्या विनवण्या भक्तांनी देवीला केल्या आहेत.
मुलगी–जावयाचा त्रास दूर कर, 5 वेळा तुझा डोंगर चढतो ! मराठी भाषेत पत्र
एका महिला भक्ताने तर चक्क मराठी भाषेत पत्र लिहून मुलगी-जावयाचा त्रास दूर करण्याची विनंती केलीय. त्रास दूर केला तर 5 पौर्णिमेला तुझा डोंगर चढतो असा नवस तिने बोललाय. ‘आई चुकलं माकल माफ कर, मी लक्ष्मी, माझी मुलगी जयश्री. माझ्या मुलीला आणि जावयाला त्यांचे भाऊ आणि भावजय त्रास देत आहेत. कुठेही गेले तरी आडवे येत आहेत. त्यांची प्रॉपर्टी त्यांना देईना झालेत. त्यांची करणी त्यांच्यावर परतवून लाव, मुलगी-जावयाला त्यांची प्रॉपर्टी मिळवून दे, 5 पौर्णिमा तुझा डोंगर चढतो, तुझा जयजयकार करून घे’ असे साकडे या शिक्षित पण अंधश्रद्धाळू, भाबड्या भाविक महिलेने देवीला घातले आहे. दरम्यान, गेले दोन दिवस लागून रेणुका-यल्लम्मा देवस्थानातील हुंडीची मोजदाद करण्यात आली. 40 दिवसांत हुंडीत 1.13 कोटी रोख रक्कम, 22 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 3.86 लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असे दान करण्यात आल्याचे मोजणीनंतर स्पष्ट झाले आहे.