मुडलगीत भयानक प्रकार उघडकीस
बेळगाव : गर्भधारणा होताच आता कुठे ते अंकुर धरू लागले होते. पण खुलण्याआधीच त्या कळ्या खुडून टाकण्यात आल्या. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७ भ्रूणांची आईच्या पोटातच असताना निर्घृण हत्या करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीत भयानक प्रकार उघडकीस आलाय. माणसाच्या क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे या घटनेतून दिसून आलेय. गर्भपात करून पोटातच खुडलेले हे कोवळे जीव प्लॅस्टिकच्या भरण्यात भरून नाल्यात टाकून दिले गेलेत. पावसाच्या पाण्याबरोबर वहात रस्त्याशेजारी येऊन पडलेल्या या भरण्यात आहेत, जन्माआधीच हत्या केलेले सात जीव. मुडलगी बसस्थानकाशेजारील नाल्यात ते टाकून देण्यात आलेत. हे खुडलेले जीव कोण व का येथे टाकले, कोणी त्यांची जन्माआधीच हत्या केली? या प्रश्नांचे उत्तर अद्याप तरी गूढच बनून राहिले आहे. गर्भपात करून, निर्दयीपणे हत्या करून बरण्यात भरून टाकलेले हे जीव पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटे आले.
दरम्यान, या घटनेबाबत बेळगावात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. मुडलगी येथे ७ भ्रूण आढळून आले आहेत. शहरातील पुलाखाली जाणाऱ्या नाल्यात ते सापडले आहेत. हा प्रकार भ्रूणलिंग परीक्षा आणि गर्भपाताचा हे हे सकृतदर्शनी दिसून येते. याबाबत नगरपंचायतीतर्फे स्थानिक पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. हे सगळे भ्रूण ५ महिने पूर्ण झालेले आहेत.
मुडलगी शासकीय इस्पितळातील शवागारात ते ठेवण्यात आले आहेत. गुहा दाखल होताच ते बेळगावातील विधिविज्ञान प्रयोगशाळेत आणून त्यांची चाचणी करण्यात येईल. हे गर्भपात कोण केले? कुठून ते आले? याचा तपास करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आणून भ्रूणहत्येच्या तपासासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येईल असे जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात पालक आणि डॉक्टरांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या अघोरी प्रकाराने संपूर्ण समाजाचेच डोके बधिर करून सोडले आहे. यात दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.