बेळगाव : ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील पायी वारी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दोन वर्षांच्या कालखंडानंतर विठू माऊलीच्या दर्शनाच्या आशेने आसुसलेल्या वारकर्यांच्या उत्साहात गावकर्यांच्या उपस्थितीत दिंडीला निरोप देण्यात आला.
गेली तब्बल 11 वर्षे अखंडपणे कंग्राळी खुर्द येथील वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीची वारी करतात. लाडक्या विठुरायाच्या दर्शनाने धन्य होतात. गेली दोन वर्षे मात्र कोरोनाच्या काळ्या छायेने वारकर्यांना माऊलीची भेट घेता आली नव्हती. मात्र विठ्ठलाच्या कृपेने यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने शासनाने आषाढी वारीला परवानगी दिली आहे. त्यामुळे वारकर्यांचा, विठ्ठल भक्तांचा उत्साह ओसंडून वहात आहे. कंग्राळी खुर्द येथील वारकर्यांनीही आज याच अमाप उत्साहाने 11 व्या वर्षी पंढरीकडे प्रस्थान केले.
गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात पूजा-प्रार्थना करून पारंपरिक भजने गात वारकर्यांनी पायी दिंडी यात्रा सुरु केली. यावेळी पायी वारीचे संयोजक आनंद बाळकृष्ण मुतगेकर यांनी माहिती देताना सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही सलग 11 व्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी काढली आहे. आमच्या वारीला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. केवळ कंग्राळीच नव्हे तर परिसरातील, शेजारच्या गावातील जे-जे भक्त, वारकरी दिंडीला येऊ इच्छितात त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जातो. पंढरीत विठुरायाचे दर्शन झाल्यावर समाधानाने परत येतो असे त्यांनी सांगितले.
