नगरसेवक रवी साळुंखे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगांव ते जांबोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्ग हा जवळचा मार्ग आहे. बेळगांव- गोवा मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असते. शिवाय बेळगावहून गोव्याला भाजीपाला पुरवठा करणारी वाहने देखील याच रस्त्याने जातात. हा रस्ता म्हणजे अपघाताचा सापळा बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगांव ते जांबोटी दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पाऊस पडत असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत. त्याचबरोबर वाहनांचे देखील नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून संबंधित खात्याला रस्ता दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली आहे.