बेळगाव : शिरविरहित मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा येथे उघडकीस आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी सुमारे ३० वर्षे वयाच्या तरुणाचा गळा चिरून शीर वेगळे करून धड विहिरीत टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुतगा येथे आज सकाळी-सकाळीच सगळ्यांना घाम फोडणारी घटना उघडकीस आली. अज्ञात युवकाचा खून करून त्याचे शीर नसलेले धड विहिरीत फेकून दिल्याचे उघड झाले. माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या शेतातील विहिरीत हे शीर विरहित धड आढळून आले. त्यांनी तातडीने मारिहाळ पोलिसांना याची माहिती दिली. मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मारिहाळ पोलिसांनी पंचनामा करून धड विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले. ते जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून देण्यात आले आहे. पोलिसांनी आता मृतांची ओळख पटविण्यासाठी शीर शोधण्यास प्रारंभ केला आहे. खून झालेला युवक कोण?, त्याचा खून कोणी केला?, कोणत्या कारणासाठी केला? याचा शोध घेण्यात येत आहे. मारिहाळचे निरीक्षक महांतेश बसापुरे यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येत आहे.