बेळगांव : अनगोळमधील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात जीवनमुखी, सागर, निखिल व शीतल फौंउंडेशनच्या वतीने करोनाच्या काळात ज्या लोकांना संकटाला सामोरे जावे लागले, अशा लोकांना धान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, बीम्सचे रेडिओलॉजिस्ट डॉ. ईराण्णा आर पल्लेद, बीम्सचे मानसिकरोग तज्ञ डॉ चंद्रशेखर टी. आर. सागर संताजी, किरण पाटील, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, पाणी पुरवठा विद्युत मंडळाचे माजी अभियंता एम. जी. राजनायकर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी प्रार्थना गायली, शिक्षिका कमलाक्षी सुरजकर यांनी परिचय करून दिला तर मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर डॉ. पल्लेद, डॉ. चंद्रशेखर टी. आर, डॉ. संजय डुमगोळ, सुजाता दप्तरदार यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश व उपक्रम राबविण्याचा मानस याबद्दल माहिती दिली. यानंतर गरीब विद्यार्थी अनुष शेट, धनराज खन्नुरकर, आयान अझीझ, श्वेतल गावडे, नागेश सावळगी, भरत खन्नूरकर, सिंचन शेट, यांना रोख पाच हजाराची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. तर कोरोना काळात अनेक घरांतील कर्ते पुरुष दिवंगत मयत झाल्यामुळे अनेक परिवारावर संकट निर्माण झाले अशा पंचवीस परिवारांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाक्षी राजूरकर यांनी केले तर वीणा जोशी यांनी आभार मानले.
