बेळगाव : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातही तो सुरूच आहे. चिक्कोडी तालुक्यातील येडूर-कल्लोळ, मलिकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज हे पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावातील आपल्या कार्यालयात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पावसाचा जोर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीतील अंतर्प्रवाह वाढला आहे. कृष्णा नदीत 70 हजार क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिप्परगी बॅरेजमधूनही तेवढेच पाणी सोडले जात आहे. चिक्कोडी तालुक्यातील येडूर-कल्लोळ, मलिकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज हे पूल वजा बंधारे पाण्याखाली आले आहेत. पर्यायी मार्गाने लोकांची ये-जा सुरू आहे. घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. आणखी तीन-चार दिवस पाऊस पडत राहणार असून, नदी काठावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात आणखी चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने आवश्यक उपायांबाबत पत्रकारांना माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात 69 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे आलमट्टी जलाशयात पाणी वाहुन जात आहे. महाराष्ट्रातील कोयना जलाशयात केवळ 22 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही धरणातून पाणी सोडले जात नाहीय. हिडकल जलाशयात केवळ 17.5 टक्के पाणीसाठा आहे. नवीलुतीर्थ जलाशयात 34 टक्के पाणीसाठा आहे. कितीही पाण्याची आवक झाली तरी धरणांची साठवण क्षमता आहे. मार्कंडेय जलाशयातही 36 टक्के पाणीसाठा आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात कोणतीही समस्या उद्भवेल अशी स्थिती नाही. येत्या काही दिवसात भरपूर पाऊस पडल्यास धरणातून पाणी सोडण्यास अडचण होणार आहे. कर्नाटक-महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात 37 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्यात एका शाळेचे नुकसान झाले. दोन हेक्टर क्षेत्रातील केळी व भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनीही सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले. आमच्याकडे आधीच एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम आहे. येत्या काही दिवसांत पाऊस बराच काळ राहिला तर अडचणीचे ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्के पाणीसाठा धरणात आहे. तहसीलदारांच्या खात्यात रक्कम जमा असून आपत्कालीन मदतीसाठी कोणतीही अडचण नाही असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …