बेळगाव : शैक्षणिक वर्ष चालू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरी अद्याप 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. आत्तापर्यंत चाळीस हजार विद्यार्थ्यांना बस पास मिळाला आहे. मात्र अजूनही चाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळण्याची आवश्यकता आहे. जुलै अखेरीस बाकीचे पास मिळण्याची शक्यता आहे.
दरवर्षी 75 हजार बसपास वितरित केले जातात मात्र यावर्षी दहावीचा निकाल चांगला लागल्यामुळे उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बस पासच्या मागणीत वाढ झाली आहे. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष 16 मे पासून सुरू झाले आहे. त्यामुळे परिवहन खात्याने 1 जून ऐवजी 23 मे पासूनच बस पास वितरण प्रक्रिया सुरू केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना वेळेत पास उपलब्ध करून देण्यासाठी वायव्य परिवहन मंडळाने यावर्षी जय्यत तयारी केली होती पण वेळेत अर्ज न आल्यामुळे पास वितरण प्रक्रियेत दिरंगाई झाली.
पास वितरणासाठी पाच संगणक बसवून ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहेत. दोन शिफ्टमध्ये काम करून पास उपलब्ध करून जुलै अखेरीस सर्व पास उपलब्ध करून देणार असल्याचे परिवहन खात्याने सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta