बेळगाव : ज्यांनी आपली हयात कराटेपटूंना घडविण्यासाठी खर्ची घातली त्या अमर बांदिवडेकर हे राष्ट्रीय पातळीवरील कराटेमधील सुवर्णपदक मिळविणारे पहिले बेळगावकर होत. त्यांचा आज जो सन्मान होत आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांनी आयुष्यभरात अनेकांना सहकार्य केले. त्यामुळेच अनेक जण उभा राहू शकले असे विचार श्री. मल्लिकार्जुन जगजंपी यांनी बोलताना व्यक्त केले. अमर्स बुडोकान स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रीडापटु श्री. अमर बांदिवडेकर, त्यांच्या पत्नी सौ. राजश्री व इतरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त घुमटमाळ मारुती मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते.
उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री संतोष होंगल यांनी केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अमर बांदिवडेकर यांचा परिचय विजय बांदिवडेकर यांनी करून दिला.
व्यासपीठावरील मान्यवरांना शाल, हार, गुलाबपुष्प व मिठाई भेट देऊन सत्कार करण्यात आला. ब्लॅक बेल्ट झालेल्या पाच जणांचा सत्कार मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले गजानन क्लासेसचे गजानन साबन्नावर, गिनीज बुकात गिर्यारोहक म्हणून नोंद झालेले रमेश अलगुंडेकर व अनंत लाड यांचीही समयोचित भाषणे झाली. त्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
गुरुवर्य नंदिहळ्ळी यांनी कर्नाटक सरकारचा चर्म शिल्पी पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष होंगल यांचा सन्मान केला. याप्रसंगी रमेश कडुकर, मोहन कलघटकर, महारुद्र यम्मी, परशुराम दुरगाडी, विनय कोळवेकर, सुमित्रा पाटील, रवी होंगल, अमर बांदिवडेकर यांचे अनेक शिष्य, हितचिंतक आणि कुटुंबीय मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले तर विजय बांदिवडेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta