बेळगाव : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उद्या रविवारी 19 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जाणार असून नाझर कॅम्प येथील विसर्जन तलाव वगळता शहर उपनगरातील विविध 7 तलाव श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर कांहीनी परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सर्वश्री मूर्तींचे विसर्जन उद्या अनंत चतुर्दशी दिवशी होणार आहे. प्रशासनातर्फे विसर्जनासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी यावेळी विसर्जनाप्रसंगी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नाईट कर्फ्यू लागू असल्याने रात्री नऊच्या आत सर्व मंडळांना व नागरिकांना श्रीमूर्तींचे विसर्जन करावे लागणार आहे. तशा सूचना पोलीस अधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 10 कार्यकर्त्यांनाच विसर्जनासाठी तलावावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे यंदा साध्या पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे.
शहर उपनगरातील कपिलेश्वर तलाव, रामेश्वर तीर्थ (जक्कीनहोंड), अनगोळ काळा तलाव, मजगाव ब्रह्मनगर तलाव, जुने बेळगाव कलमेश्वर तलाव, किल्ला तलाव आणि कणबर्गी तलाव अशा सात ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सात विसर्जन तलावाच्या ठिकाणी विद्युत सुविधा, मोठ्या तलावाच्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
आवश्यक ठिकाणी मनपा अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा वडगाव नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावात श्री मूर्ती विसर्जनास बंदी आहे. नाझर कॅम्प येथे विसर्जन कुंड तयार करण्यात आला असला तरी मागील वर्षी या कुंडा शेजारील विहीर कोसळली आहे. परिणामी या ठिकाणी असलेली माती ढासळल्याने विसर्जन तलावाला धोका निर्माण झाला आहे. तसेच विसर्जनासाठी पाणी भरल्यानंतर तलाव फुटण्याचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या तलावांखेरीज गणेश भक्तांच्या सोयीसाठी शहर व उपनगरात फिरते विसर्जन कुंड देखील कार्यरत असणार आहेत.
