महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतून कागदपत्रे देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत झालेल्या या बैठकीत नेहमीप्रमाणे जिल्हाधिकार्यांनी मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात हातवर केले. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनातूनच शासनाला आमची ताकद दाखवून देऊ असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. मराठी भाषिकांना मराठी भाषेतूनच सरकारी कागदपत्रे देण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. या संदर्भात नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बेळगाव जिल्हा प्रशासन किंवा सरकार पातळीवर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या 8 ऑगस्ट रोजी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. त्या संदर्भात आज म. ए. समिती नेत्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार 15%हुन अधिक ज्या भाषेचे लोक ज्या प्रदेशात राहतात, तेथे त्यांना त्यांच्या मातृभाषेतून सातबारा उतारे, जन्म-मृत्यू दाखले व अन्य संबंधित कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कायद्यानुसार आम्ही मराठी भाषिकांना मराठीतून सरकारी कागदपत्रे देण्याची मागणी करत आहोत, असे समिती नेत्यांनी जिल्हाधिकार्यांना सांगितले. मात्र याला आपण असमर्थ असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
त्यामुळे येत्या 8 ऑगस्टला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ठिय्या आंदोलन करू. एवढ्यावरच हे आंदोलन थांबणार नाही. तर 15 ऑगस्टपर्यंत सीमाभागातील प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करू. माजी नगरसेवक आणि माजी महापौरही महापालिकेसमोर आंदोलन करून पालिका आयुक्तांना निवेदन देतील. आता रस्त्यावरच्या आंदोलनातूनच शासनाला आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा दीपक दळवी यांनी दिला.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.