आ. श्रीमंत पाटील : स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त ऐनापुरला रोपवाटप
अथणी (प्रतिनिधी) : पर्यावरण व निसर्गसौंदर्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे निसर्गाचे सौंदर्य करायचे असेल तर प्रत्येकाने एक तरी रोपटे लावले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले.
आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने ऐनापुर येथे यापूर्वीच ट्री पार्क मंजूर झाले आहे. सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अथणी उपवनविभागाने ऐनापुर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात रोपटी वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदारांच्या हस्ते रोप लावून आकाशात कबुतरे व फुगे उडवून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, उद्योग व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने आज माणूस झाडे तोडून त्या ठिकाणी सिमेंटचे जंगल उभारत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करणे हे भविष्यातील पिढीसाठी धोकादायक आहे. यासाठी पर्यावरणाचे जतन करणे व निसर्गात वाढ करणे ही जबाबदारी आता तरुण पिढीची आहे, ती त्यांनी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. ट्री पार्क सोबतच ऐनापुर गावच्या विकासासाठी ही 50 लाखाचे अनुदान दिले आहे. भविष्यात येथील ऐतिहासिक तलावाच्या विकासासाठी ही मोठा निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासनही आमदार पाटील यांनी दिले. यावेळी विद्यार्थ्यांना 1 हजार रोपट्यांचे वितरण करण्यात आले. याचा संदर्भ देऊन आ. पाटील म्हणाले, ती जगवण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर पाणी घालून व देखभाल करून ही रोपटी जगवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कागवाडचे तहसीलदार राजेश मुरली म्हणाले, स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र राज्य सरकारने हर घर तिरंगा ही मोहीम सुरू केली आहे, प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावून देशाभिमान जपावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उप वनविभागाचे डीएफओ अँथोनी मरियप्पा, वनाधिकारी सुनीता निंबरगी, केआरईएस शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दादागौडा पाटील, भाजप कागवाड विभागाचे अध्यक्ष तम्मन्ना पारशेट्टी, प्रवीण गाणीगेर, सुभाष पाटील, रतन पाटील, डॉ. उदय निडगुंदी, उदय माने-पाटील, यशवंत पाटील, कुमार अपराज, विश्वनाथ करची यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta