आमदार अभय पाटील यांची कार्यतत्परता : येळ्ळूरवासीयांकडून आमदारांचे अभिनंदन
येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या नागरिकांच्या हिताकरिता व सोयीच्या दृष्टीने येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची नितांत अशी गरज आहे याबाबतचे निवेदन शुक्रवार (ता. 12) रोजी आमदार अभय पाटील यांना येळ्ळूरचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने देण्यात आले व शववाहिका येळ्ळूर गावासाठी का गरजेची आहे याबाबतची माहिती देण्यात आली व याबाबतचे निवेदन आमदार अभय पाटील यांना देण्यात आले. आमदार अभय पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला व याची गांभीर्याने दखल घेत, तात्काळ फोनवर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आपल्या आमदार फंडातून येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची (हर्षे व्हॅन) व्यवस्था करण्यासाठी सांगितले. निवेदन देणाऱ्या नागरिकांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, लवकरच शववाहिका येळ्ळूर गावासाठी उपलब्ध करून देऊ व सदर शववाहिका देखभालीकरीता येळ्ळूर ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करूया असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. येळ्ळूरकरांच्या वतीने डॉ. तानाजी पावले व प्रा. सी. एम. गोरल यांनी येळ्ळूर गावासाठी शववाहिकेची का गरज आहे, याची जाणीव आमदार अभय पाटील यांना करून दिली. येळ्ळूर गावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामानाने लोकसंख्याही वाढत चालली आहे. लोकांची वस्ती परमेश्वर नगरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गावासाठी येळ्ळूर वेशीत एक स्मशानभूमी आहे. तेव्हा परमेश्वर नगरमधील एखादी व्यक्ती मृत झाल्यास साधारण दोन किलोमीटर पर्यंतचे अंतर लोकांना शव घेऊन खालीपर्यंत चालत यावे लागत आहे. पावसाळ्यामध्ये तर लोकांना भलताच त्रास होत आहे, याचे गांभीर्य आमदार अभय पाटील यांना करून देण्यात आले. तात्काळ याची गांभीर्याने आमदार अभय पाटील यांनी दखल घेतली व लवकरच येळ्ळूर गावासाठी एक शववाहिका (हर्षे व्हॅन) उपलब्ध करून देऊ असे सांगितले. आमदारांच्या या कार्यतत्परतेबद्दल येळ्ळूरच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात येळ्ळूर गावासाठी व त्यानंतर मच्छे, पिरनवाडी व धामणे याही गावांना नंतरच्या टप्प्यात शववाहिका उपलब्ध करून देण्यात येईल असेही आमदार अभय पाटील यांनी यावेळी सांगितले. निवेदन देतेवेळी डॉ. तानाजी पावले, ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, प्रा. सी. एम. गोरल, नारायण काकतकर, शिवाजी माणकोजी, मयूर मासेकर, रविकांत पाटील, दत्ताजी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta