बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजप, आरएसएसचे काहीच योगदान नाही. आपण शांत बसलो तर उद्या आपणच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे मोदी म्हणतील. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हे लोकांना सांगण्याचे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.75 व्या स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त गोकाक विधानसभा मतदारसंघातील विविध शहरे व गावांमध्ये आयोजित भव्य पदयात्रेचा शुभारंभ सतीश जारकीहोळी यांनी केला.
त्यानंतर बोलताना जारकीहोळी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्यास नकार दिला होता. मात्र आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवासाठी ते सर्वत्र धावाधाव करत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक महान नेत्यांनी बलिदान दिले. त्या महान नेत्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. तरुणांनी खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे पामलदिन्नी, घटप्रभा, शिंदीकुरबेट, धुपदाळ, कोण्णूर, सावळगी, मरडीमठ, गोकाक फॉल्स येथे पदयात्रा काढण्यात आली. त्यात काँग्रेस पक्षाचे नेते अशोक पुजारी, शंकर गिड्डन्नावर, विवेक जत्ती, पुट्टू खानापुरे, मारुती विजयनगरे, प्रकाश डांगी, रवी नावी, मंजुळा रामगनट्टी, शिवलिंग कोटबागी, प्रवीण गुड्डाकाई, गौडप्पा होळय्याचे आदींचा सहभाग होता.