बेळगाव : नियमीत बस सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील मच्छे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज रास्ता रोको करून आंदोलन केले.
मच्छे गावातून दररोज शेकडो विद्यार्थी बेळगावला विविध शाळा आणि महाविद्यालयांसाठी येतात. विद्यार्थ्यांना येण्यासाठी योग्य बस व्यवस्था नाही. बसेसची संख्या कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी बसच्या दारात उभे राहून प्रवास करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासंदर्भात केएसआरटीसीच्या अधिकार्यांना अनेकदा विनंती करण्यात आली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी शुक्रवारी खानापूर-गोवा महामार्ग रोखून निदर्शने केली.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी याला जुमानले नाहीत. जोपर्यंत बस सुविधा देण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta