बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा निर्मूलन डेपोचा कॉलम भरणी पूजन कार्यक्रम दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. या कचरा निर्मूलन डेपो उपक्रमासाठी नरेगाच्या माध्यमातून वीस लाख रुपये निधी मिळालेला आहे.
कचरा निर्मूलन ही जबाबदारी ग्रा. पंचायती बरोबर नागरिकांचीही आहे. त्यासाठी व्यवस्थित स्वरुपात प्रयत्न होणे अपेक्षित होते त्यामूळे ही बाब लक्षात घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने नरेगाच्या माध्यमातून कचरा डेपो उपक्रमाची मागणी करण्यात आली होती. या उपक्रमासाठी 20 लाख मंजूर झाले असुन कचरा निर्मूलन डेपोचा कॉलम भरणी पूजन कार्यक्रम आज पार पडला.
येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्या हस्ते कॉलम भरणीचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी सांगितले की, गावातील जो काही सुका कचरा आहे त्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन करण्यासाठी या कचरा निर्मूलन डेपोची सुरुवात करण्यात आली आहे.
गावामध्ये कचर्यासाठी एक गाडीची सोय आहे परंतु गाव मोठे असल्याने आणखीन एका गाडीची गरज असल्याने या संदर्भातही मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच गावात किती कचरा निर्माण होतो, कर्मचारी किती, वाहने किती, कचर्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याची माहिती घेऊन यासंदर्भातील ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून लवकरच या उपक्रमाची सुरुवात होणार आहे अशी माहितीही ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली.
हा उपक्रम पूर्ण होताच गावातील प्रत्येक घरातील कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावून गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेनसे, शिवाजी नादुरकर चौगुले, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, राजू डोण्ण्यानवर, कल्लाप्पा मेलगे, शांता काकतकर, ग्रा. पं. सेक्रेटरी सदानंद मराठे, क्लार्क उदय हूंदरे, कलमेश कोलकार, कम्प्युटर ऑपरेटर निर्मला, येळ्ळूर ग्रा. पं. स्टाफ तसेच कंत्राटदार शिवाजी भातकांडे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta