बेळगाव : राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी बेळगाव बार असोसिएशनने केली आहे. गुरुवारी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांच्या नेतृत्वाखाली बार असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले. बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना बार असोसिएशचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी म्हणाले, बेळगाव हे उंचावरील शहर आहे. येथे नागरी सुविधाही भरपूर आहेत. शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असल्याने येथील हवामानही चांगले आहे. उत्तम विमानतळ असलेले बेळगाव हे महाराष्ट्र, गोवा या राज्यांना जोडणारा दुवाही आहे. दुसरी राजधानी म्हणून गणल्या जाणार्या बेळगावमध्ये सुवर्णसौध देखील बांधली गेली आहे. या सुवर्णसौधमध्ये अधिवेशनदेखील भरविले जाते. बेळगावमध्ये अनेक जुनी विधी महाविद्यालये (लॉ कॉलेज) आहेत. यामुळे बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात सचिन शिवांनावर, सुधीर चव्हाण, गिरीराज पाटील, बंटी कपाही, महांतेश पाटील, एम बी जिरली, अभिषेक उदोशी, आदर्श पाटील, इरफान ब्याळ, प्रभाकर पवार आदी सहभागी झाले होते.