बेळगाव : येळ्ळूर येथे शनिवारी पहाटे सराफी दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली. गावकरी साखरझोपेत असतानाच चोरट्यांनी साखळी चोऱ्या करून धुडगूस घातला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळ्ळूर गावातील परमेश्वर नगर येथील बालाजी ज्वेलर्स हे दुकान शनिवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी फोडले. 5 लाख 50 हजार रु. किंमतीचे आठ किलो चांदीचे दागिने घेऊन ते फरार झाले. यावेळी शेजारी राहणारे विनायक संभाजी हे संशयावरून बाहेर आले असता चोरट्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून दागिन्यांच्या दुकानाची चाव्या त्यांच्या अंगावर फेकून देऊन तेथून पळ काढला. या चोरीच्या आधी चोरट्यांनी इंडियन गॅसचे कार्यालय आणि जिजाऊ मेडिकलच्या दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. तसेच येळ्ळूर गावाजवळील अवचारहट्टी गावात नंदकुमार कणबरकर नावाच्या व्यक्तीने घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण सीपीआय श्रीनिवास हांडा व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta