
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतक्षेत्राचे लोकप्रिय आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्यावर बेल्लद बागेवाडी येथील कत्ती यांच्या शेतवाडीतील समाधीस्थळी सायंकाळी ७.४५ वाजता शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार ( दफनविधी ) करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, एच. डी. रेवण्णासह मंत्रीगण, आमदार अनेक मान्यवरांनी उमेश कत्तीं यांंच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार पुष्पवृष्टी वाहून श्रध्दांजली वाहिली.

विश्वराज शुगर्स येथे अंत्यदर्शन..
विश्वनाथ शुगर्स येथे मंत्री उमेश कत्ती यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तास-दिड तासभर ठेवण्यात आले होते. येथे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, भाजपाचे राज्याध्यक्ष नवीनकुमार कटील, सी.टी. रवी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, मंत्री गोविंद कारजोळ, आर अशोक, शिवराम हेब्बार, सी.सी पाटील, जगदीश शेट्टर, रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, डॉ. प्रभाकर कोरे, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, प्रकाश हुक्केरी, गणेश हुक्केरी, लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. अंजली निंबाळकर, अशोक पट्टण,माजी मंत्री ए. बी. पाटील, फिरोज शेठ, बसवराज होरट्टी, सहकारी नेते डी. टी. पाटील, अप्पासाहेब शिरकोळी, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, हजारो अभिमानी कार्यकर्ते चाहते यांनी आपल्या लाडक्या नेत्यांचे अंतिम दर्शन घेऊन अभिवादन केले.
वीरशैव लिंगायत संप्रदाय नुसार अंत्यसंस्कार..
हुक्केरीचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी वीरशैव लिंगायत संप्रदायनुसार मंत्री उमेश कत्ती यांच्या पार्थिवावर उमेश कत्ती यांच्या पत्नी शिला कत्ती, सुपुत्र निखिल कत्ती यांच्या हस्ते पूजाविधी विधानाने अंतिमसंस्कार केले. यावेळी निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी कुडलसंगमचे डॉ. बसवजय मृत्युंजय महास्वामीजी अन्य मठाधिश तसेच कत्ती कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
सांबरा विमानतळावर पार्थिव उशीरा पोचले..
दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे बेंगळूर येथे मंगळवार दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री १०.४५ वाजता तीव्र ह्रदयघाताने निधन झाले. त्यांना ह्रदयघाताचा धक्का पोचताच लागलीच बेंगळूर येथील एम.सी. रामय्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यांनी उमेश कत्ती यांना शर्थीचे प्रयत्न करुन देखील वाचविता आले नाही. मंगळवारी रात्री उशीरा हुक्केरी मतक्षेत्रात उमेश कत्ती यांचे ह्रदयघाताने निधन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे हुक्केरी मतक्षेत्रातील त्यांच्या असंख्य अभिमांनीना चाहत्यांना मोठा धक्का बसला. मतक्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांनी रात्र जागून काढली. मंत्री उमेश कत्ती यांचे पार्थिव बेंगळूर येथून विशेष विमानाने आणण्याची तयारी करण्यात आली. प्रतिकूल हवामानामुळे एच.ए. एलच्या विशेष विमान तब्बल पाच तास उशीरा म्हणजे दुपारी २ वाजता बेळगांव सांबरा विमानतळावर पोहचले. तेथे नेत्यांनी अनेक मान्यवरांनी चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले. नंतर फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या वाहनातून बेळगांव सांबरा येथून मंत्री उमेश कत्ती यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा हुक्केरी येथे पोचताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी अभिमानींनी आपल्या लाडक्या नेत्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करुन अंतिम नमन केले. बेल्लद बागेवाडी येथे पार्थिव पोचताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी अश्रूनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले, माजी खासदार रमेश कत्ती आणि कत्ती कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शोकाने उपस्थितांचे डोळे पाणावलेले दिसले. कत्ती यांच्या शेतवाडीतील समाधीस्थळी शोकाकूल वातावरणात उमेश कत्ती यांचा दफनविधी पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta