
बेळगाव जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली : 35 घरे कोसळली
बेळगाव (प्रतिनिधी) : सीमाभागातील बेळगाव जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परिणामी बेळगाव तालुका, शहर परिसर आणि जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार सुरूअसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली गेले असून 36 घरे कोसळून नुकसान झाले आहे.
शनिवारी सायंकाळपासून बेळगाव जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे घटप्रभा, मलप्रभा आणि हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. घटप्रभा नदीतून रविवारी सायंकाळपर्यंत 28 हजार क्युसेक पाणी साठा होता. तर राजा लखम गौडा जलाशयातून सध्या 28 हजार क्युसेक एवढ्या जादा पाण्याचा विसर्ग सुरूआहे.
याशिवाय बळ्ळारी नाला आणि हिरण्यकेशी नदीसह घटप्रभा नदीत एकूण 37 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
मलप्रभा नदीच्या प्रवाहात वाढ
पश्चिमघाट, कणकुंबी आणि खानापूर येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मलाप्रभा नदीत ही पाण्याची आवक वाढली असून नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग 1500 क्युसेक वरून 4000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. पाऊस वाढल्यास पाण्याची आवकही वाढणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रामदुर्ग शहराला जोडणारा जुना पूल पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता बळावली आहे.
पश्चिम घाट आणि जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय शंभर टक्के भरले आहेत. जलाशयातील पाण्याची आवक जास्त असल्याने घटप्रभा आणि हिरण्यकेशी नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे सदर नद्यांच्या काठावरील लोकांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta