Tuesday , June 18 2024
Breaking News

पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण त्वरीत हटवावे

Spread the love

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज दुसरे तथा मराठा साम्राज्यविषयी कन्नड आणि इंग्रजी पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असलेला धडा घालण्यात आला आहे त्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना आज मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी युवा समितीचे पदाधिकारी गेले असता पूर्वकल्पना देऊन सुद्धा कोणीच अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
प्रमुख अधिकार्‍यांच्या अनुपस्थित श्री. मुदकान्नावर यांच्याकडे खालील आशयाचे निवेदन देण्यात आले.
नमूद विषयाप्रमाणे इयत्ता नववीच्या कन्नड आणि इंग्रजी माध्यमाच्या समाजविज्ञान पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील मोगल आणि मराठा या धड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि छत्रपती शाहू महाराज दुसरे तथा मराठा साम्राज्याबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद लिखाण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असून त्यांच्या सामर्थ्यामुळे व बलिदानामुळे अखंड स्वराज्य रक्षण झाले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज दुसरे यांनी मराठा साम्राज्य अटकेपार पोहचवून त्या स्वराज्याचा विस्तार केला. पण पुस्तकामध्ये अश्या पद्धतीने चुकीचा इतिहास लिखाण करून लेखकांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, तरी सदर लिखाण करणार्‍या लेखकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच सदर पुस्तक माघारी घेऊन नव्याने छपाई करण्यात यावी. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास नव्याने सन्मानाने सामील करण्यात यावा अशी मागणी बेळगावातील समस्त शिवशंभू प्रेमी जनतेकडून आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अशी मागणी केली आहे.
यावेळी कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सागर मूतगेकर, वासू सामजी, विनायक कावळे, रणजित हावळणाचे, अश्वजित चौधरी, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

Spread the love  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *