आ. श्रीमंत पाटील यांच्या कार्याने भारावलो : मदभावी येथे भाजपचा भव्य मेळावा
अथणी : कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांचे स्वच्छ राजकारण, निर्मळ मनाने जनतेची सेवा करण्याचे ध्येय आणि त्यांनी मतदारसंघात आणलेली विकासगंगा याला भारावूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, अशी भावना अनंतपूरचे माजी जि. पं. सदस्य दादा शिंदे व अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली.
मदभावी (ता. कागवाड) येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात भाजपचा भव्य मेळावा झाला. या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे 200 हून अधिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अनेकांनी आपली भावना व्यक्त केली.
भाजपचे राज्य अध्यक्ष नलीनकुमार कटील, माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री व विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, चिकोडीचे खा. आण्णासाहेब जोल्ले, अथणीचे आ. महेश कुमठळ्ळी, कुडचीचे आ. पी. राजीव, चिकोडी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून कागवाड मतदारसंघातील काँग्रेसचे अनेक नेते, जिल्हा, तालुका पंचायत तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक होते. यासाठी बुधवारचा मुहूर्त उजाडला. मदभावी येथील सिद्धेश्वर मंदिरात भव्य भाजप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनंतपूर जि. पं. मतदारसंघाचे माजी सदस्य दादा शिंदे, ग्रा. पं. सदस्य सर्वश्री कुमार हबगुंडे, मल्लेश मेत्री, सुनील होनखंडे, नाना डांगे, युवराज मालगावी, नेताजी जाधव, सिद्राय करोली, विठ्ठल नाईक, अशोक अथणीकर यांच्यासह 15 ग्रामपंचायत सदस्य व 200 हून अधिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नलीनकुमार कटील, आ. श्रीमंत पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
नव्याने भाजपमध्ये प्रवेश करणारे दादा शिंदे यांच्यासह काही ग्रा. पं. सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आतापर्यंत आम्ही अनेक आमदार पाहिले. परंतु, श्रीमंत पाटील यांच्यासारखा निर्मळ मनाचा राजकारणी आम्ही याआधी पाहिला नाही. ते जे करतात ते फक्त जनते कल्याणासाठी, हे वारंवार दिसून आले आहे. तात्या व त्यांचे चिरंजीव युवानेते श्रीनिवास पाटील यांचा मृदूभाषी स्वभाव, जात-धर्म-पंथ न मानता सर्वांना सामावून घेत पुढे घेऊन जाण्याचे व्यवस्थापन, हे सर्व पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. यामुळेच काँग्रेस सोडून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे मत व्यक्त केले.
दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न
पक्षप्रवेश केलेल्या अनंतपूर ग्रा. पं. च्या 15 सदस्यांपैकी काहींनी आपले मनोगत मांडले. गेली अनेक वर्षे दुष्काळी भागाचा विकास झालेला नाही. या भागाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी आ. श्रीमंत पाटील यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. विशेषतः दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार्या बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचा त्यांनी जो पाठपुरावा केला आहे, त्याला तोड नाही. ही योजना पूर्ण करणारच, असा विडा त्यांनी उचलला असून डिसेंबरअखेर याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रस्ते डांबरीकरण, पाणी योजना, बंधारे, शाळांचा विकास अशी अनेक विकासकामे त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत पूर्णत्वास नेली आहेत. सामान्यांचे दुःख जाणून काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच आम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार आहोत, अशी भावना व्यक्त केली.
सर्वांचे मत ऐकून घेत नलीनकुमार कटील यांनी आ. पाटील यांचा या मतदारसंघात वाढलेला प्रभाव व त्यांच्याकडे आकर्षित होत असलेले सर्वसामान्य लोक, याचे कौतुक केले. यावेळी खा. जोल्ले, आ. श्रीमंत पाटील, आ. लक्ष्मण सवदी, आ. महेश कुमठळ्ळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रतिक्रिया

आमदार श्रीमंत पाटील जे बोलतात ते करतात. इतर राजकारण्यांसारखे उगीच द्यायचे म्हणून ते आश्वासन देत नाहीत. त्यांचा हाच स्वभाव आम्हाला भावल्याने माझ्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्या भाजपवासी झाले आहेत. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकासकामे करत राहू. – दादा शिंदे, माजी जि. पं. सदस्य
Belgaum Varta Belgaum Varta