बेळगाव (प्रतिनिधी) : सौंदत्ती यल्लमा देवस्थान परिसर विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. येथील समस्या भाविकांना भेडसावणाऱ्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधांची पूर्तता करून भाविकांची सौंदत्ती यल्लमा यात्रा सुकर होईल याची काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव, सकल मराठा समाजाचे संयोजक-संघटक आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार आणि काडा अध्यक्ष डॉ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते.
सौंदतीचे यल्लमा देवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कर्नाटकासह, महाराष्ट्र आणि गोवा येथून सुमारे 40 लाखांहून अधिक भाविक यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जातात. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल आणि डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला यल्लमा डोंगर भाविकांनी गजबजुन जातो. मात्र दर्शन आणि यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना यल्लामा देवी कार्यक्षेत्रातील समस्या भेडसावतात.
जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. येथे स्वच्छतेचा अभाव आहे, पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते, दर्शन रांगेतील कटांजन सुव्यवस्थित नाहीत. यामुळे भाविकांच्या मुलभूत सुविधांअभावी बेळगाव जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करून भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी किरण जाधव आणि विश्वनाथ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
ही बाब गांभीर्याने घेऊन यासंदर्भात लवकरच संबंधित तहसीलदार, एसी यांच्याशी बोलून मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta