बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, कन्नड सक्तीचा बडगा, जमीन, पाणी, आणि भाषेवरून सुरु असलेला वाद आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने तुळजापूर देवस्थानासंदर्भात दाखविलेला उदारमतवादीपणा… आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठीसोबतच कन्नड आणि तेलगू भाषेत भाविकांना माहिती देणारे फलक बसवून महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील भाविकांची मने जिंकली आहेत. आदिशक्ती तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कर्नाटकातील भाविकांसाठीदेखील तुळजाभवानीचे महत्व खूप आहे. या देवस्थानात वर्षभर भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवात हि गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने देवस्थान परिसरात कन्नड आणि तेलगू भाषिकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. चोर-खिसेकापूंपासून सावध रहा, प्रथमोपचार केंद्र, पार्किंगकडे जाणारा मार्ग, बस वेळापत्रक आदी फलक महाराष्ट्र सरकारने मराठीसह कन्नड, तेलगू भाषेतही लावले आहेत. केवळ नवरात्रच नाही तर वर्षभर कर्नाटकातील भाविक मोठया संख्येने आदिशक्ती तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये दाखल होतात. या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेली दखल हि खरोखरच कौतुकास्पद असून महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिक भाविकांसाठी दिलेल्या आदराच्या वागणुकीमुळे आनंद व्यक्त होत आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरातच केवळ कन्नड भाषेचा वापर केला जात नाही, तर देवस्थानातील अनेक पुजारी देखील कन्नड भाषेचा वापर करून पूजाविधी करतात. अनेक भाषिक भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. या प्रत्येकाचा आदर या देवस्थानात केला जातो हे विशेष.
Belgaum Varta Belgaum Varta