बेळगांव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो क्रिकेट मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगांव शहराने विजेतेपद पटकाविले.
उपांत्य सामन्यात बेळगांव तालुक्याने खानापूर तालुक्याचा 10 धावांनी पराभव केला. तर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगांव शहराने 14 षटकात 1 बाद 156 धावा केल्या त्यांच्या सिद्धेश असलकरने नाबाद 54, आशुतोष हिरेमठने 11, तर आकाश कुलकर्णीने नाबाद 68 धावांचे योगदान दिले. बेळगांव तालुक्यातर्फे व दर्शनने 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरदाखल बेळगांव तालुक्याने 14 षटकात 8 बाद 77 धावा जमविल्या व सामना 79 धावांनी एकतर्फी गमविला बेळगाव शहरातर्फे स्वरूप साळुंखे, वेदांत पाटील, यांनी प्रत्येकी 2 गडी तर सिद्धेश असलकर, आकाश कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला व बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी. एस. दिग्रज,जिल्हा शारीरिक शिक्षण माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, अन्नीगेरी, विवेक पाटील, नागराज भगवंतण्णावर, चंद्रकांत पाटील, जयसिंग धनाजी, प्रमोद असलकर उमेश मजुकर, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रशांत वाडकर, सुनील देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta