बेळगाव : पतंग उडवताना नजरचूकीने इमारतीच्या छतावरून पडून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी बेळगावातील अशोकनगरमध्ये घडली.
11 वर्षीय अरमान दफेदार या सेकंड क्रॉस, तिरंगा कॉलनी, उज्वल नगर येथे राहणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल, बुधवारी हा मुलगा त्याच्या कुटुंबीयांसह अशोकनगर येथील नातेवाईकाच्या घरी आला होता. यावेळी नास्ता झाल्यानंतर तो मोठ्या भावासोबत पतंग उडवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेला. यावेळी पतंग उडवताना तो घसरला आणि खाली पडला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार अपयशी ठरल्याने अरमानने आज, गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मुलगा गमावलेल्या कुटुंबीयांनी यावेळी एकच आक्रोश केला.
या संदर्भात नगरसेवक अफजल पठाण आणि अझीम पटवेगार यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल माहिती दिली. एका गरीब मजुराच्या मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. मृत अरमान हा बशीर दफेदार यांचा तिसरा मुलगा आहे. ज्या कोवळ्या मुलाने अजून खूप जगायला हवं होतं त्याचा अशा प्रकारे अंत झाला ही मोठी शोकांतिका आहे. माळमारुती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta