
बेळगाव : शहरात आज ईद-ए-मिलादनिमित्त तंजूम कमिटी बारा इमामतर्फे भव्य जुलूस काढण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले हजरत सय्यद काशीम अश्रफ, जिलानी उर्फ बाबा ए मिल्लत किचोचा, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, सर्व एसीपी, मान्यवर अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ, बेळगाव शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी, रमेश कळसन्नवर, बाबूलाल राजपुरोहित आदींचा सहभाग होता.
सीरत कमिटीचे बागवान, सय्यद बुखारी, मुस्ताक शेख, अल्ताफ कागझी, रियाज शेख, अनीस मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी बोलताना मौलवी म्हणाले की, नमाज हा इस्लामचा पाया आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करावी. यामुळे जागतिक शांतता नांदेल. मुस्लिम हा पवित्र धर्म आहे. त्यामुळे त्यांनी कष्ट करून चांगले जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी बोलताना मुफ्ती मंजूर आलम यांनी ईद सण साजरा करण्यामागील इतिहास सांगितला. यावेळी बोलताना माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले की, बेळगाव शहरात आज ईद मिलाद कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसह काही अन्य समाजबांधवही सहभागी झाले आहेत. हे सुचिन्ह आहे. हिंदू मित्रांनी आमच्या मशिदींना भेट द्यावी. आम्ही तेथे 5 वेळा प्रार्थना करतो, तेथे आत काय चाललंय ते पाहून तुम्हीच बाहेर येऊन सांगावे असे सांगून त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या म्हणाले, हा कार्यक्रम गेल्या १२ दिवसांपासून शहरात उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे आमच्या विभागाकडून शहरात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यांनी सर्वांना शांततेत साजरे करण्यास सांगितले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र गडादी म्हणाले की, कोणताही धार्मिक सण अत्यंत शिस्तीने साजरा केला पाहिजे आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी ध्वजारोहण करून मिरवणुकीचे उदघाटन केले. त्यानंतर धर्मगुरूंना रथात बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta