
बेळगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीसह अनेक नवीन योजना राबविल्या असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे खासदार मंगला अंगडी यांनी येथे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत देशभरातील एकूण 600 ठिकाणी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर मंगला अंगडी यांनी बेळगाव ए.पी.एम.सी. येथील एस.डी. कलमनी यांच्या दुकानात बेळगाव केंद्राचे उद्घाटन करून व समारंभाला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर देशात कृषी क्षेत्रावर अधिक भर दिला जात आहे. 2014 नंतर देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवल्या आहेत. अनेक नवीन योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना चांगली बाजारपेठ मिळावी या उद्देशाने नवीन बाजार व्यवस्था राबविली जात असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने नुकतेच सुरू केलेले प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र शेतकऱ्यांना सर्व आवश्यक माहिती पुरवते. केंद्र सरकार युरिया खतामध्ये सुधारणा करून नॅनो युरियाच्या उत्पादनावर अधिक भर देत आहे. हा नॅनो युरिया शेतकऱ्यांसाठी सोयीचा ठरणार आहे. त्यानुसार माती परीक्षण, बाजाराची माहिती, बियाणांचा दर्जा यासह सर्व माहिती या केंद्रावर उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
समारंभात प्रास्ताविक करताना बेळगाव कृषी विभागाचे सहसंचालक शिवनागौडा पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजनेंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हप्त्यांमध्ये 1587 कोटी रुपयांची मदत दिली आहे. ते म्हणाले की, आज केंद्र सरकारने 12 वा हप्ता जाहीर केला असून 107 कोटी रुपयांचे अनुदान 5 लाख 38 हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना चांगला भाव मिळण्यासाठी सतत बाजाराची माहिती घेत रहावे
परदीप फॉस्फेप लि.चे प्रादेशिक मार्केटिंग अधिकारी गणेश हेगडे, कृषी तज्ज्ञ डॉ.बी.जी. विश्वनाथ यांची या समारंभात भाषणे झाली. याच प्रसंगी प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगर सेविका रेश्मा पाटील सविता कांबेरी, संदीप, कृषी विभागाचे उपसंचालक एस.बी. कोंगवाड, फासेप कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक संजू मानेप्पागोल, भीमुदादा भिरडे, किसान समृद्धी केंद्राचे शांतीनाथ कलमनी, रोहन कलमनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरैना स्वामी आर. यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta